दोन वर्षांचा चिमुकल्याचा पाण्याच्या हौदात बुडून मृत्यू
प्रतिनिधी | चोपडा
शहरातील सुंदरगढी येथील रहिवासी असलेले भूषण दिलीप देशमुख यांचा दोन वर्षीय मुलगा खेळत असताना पाण्याच्या हौदात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि ३ रोजी संध्याकाळी ५.३० वाजेच्या सुमारास सुंदरगढी येथे घडली आहे.

शहरातील प्रताप विद्या मंदिर येथील शिक्षक भूषण देशमुख यांचा दोन वर्षांचा मुलगा कलश हा सुंदरगढी येथील राहत्या घरी खेळत असताना दि ३ मे रोजी संध्याकाळी ५.३० वाजेच्या सुमारास
पाण्याच्या हौदात जाऊन पडला,आणि काहीवेळाने नातेवाईकांनी कलशचा शोध घेतला असता कलश घराबाहेरील पाण्याच्या हौदात बुडालेला दिसून आला.
त्यानंतर नातेवाईकांनी उपचारासाठी कलशला शहरातील खाजगी दवाखान्यात दाखल केले परंतु दोन वर्षीय चिमुकल्याला डॉक्टरांनी मयत घोषित केले.

त्यानंतर त्याला उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.यावेळी कलशच्या आईवडिलांसह नातेवाईकांनी मोठा हंबरडा फोडला होता.
या प्रकरणी चोपडा शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.













