टाटायन हे उद्यमशीलतेला प्रोत्साहन व प्रेरणा देणारे मराठीतील सर्वोत्तम पुस्तक ,व्याख्याते जयदीप पाटील

टाटायन हे उद्यमशीलतेला प्रोत्साहन व प्रेरणा देणारे मराठीतील सर्वोत्तम पुस्तक ,
व्याख्याते जयदीप पाटील

चोपडा प्रतिनिधी :—
टाटा कुटुंब हे कधीही निवांत राहिले नाही. सतत उद्यमशील असणे हा टाटा परिवाराचा वैशिष्ट्यपूर्ण गुण आहे. टाटा म्हणजे विश्वास, उत्कर्ष यापेक्षाही टाटा म्हणजे संघर्ष हे अधिक संयुक्तिकपणे टाटायन या कादंबरीतून लेखक गिरीश कुबेर यांनी अतिशय प्रभावीपणे मांडले आहे. या पुस्तकात अनेक दुःखद प्रसंग अलगदपणे मांडले असून टाटा समूहाच्या इतिहासातील अनेक प्रेरक प्रसंगही प्रभावीपणे रेखाटले आहेत. टाटायन हे उद्यमशीलतेला प्रोत्साहन आणि प्रेरणा देणारे मराठीतील सर्वोत्तम पुस्तक असल्याचे जळगाव येथील नोबेल फाऊंडेशनचे संस्थापक व प्रेरणादायी युवा व्याख्याते जयदीप पाटील यांनी सांगितले.


महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेच्या चोपडा शाखेतर्फे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित केल्या जाणाऱ्या ‘मसाप गप्पा’ या कार्यक्रमात ते गिरीश कुबेर लिखित ‘टाटायन’ या चरित्रात्मक साहित्यकृतीवर श्रोत्यांशी गप्पा मारत असताना बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले टाटा उद्योग समूह आता अनेक वेळा बघायचे प्रसंग आले पण उद्योग बंद असताना टाटा कधीही एकही कर्मचारी कामावरून काढला नाही किंवा त्यांचे वेतन बंद केले नाही. टाटांनी अनीतीचा व्यवसाय कधीही केला नाही. दूरदृष्टी, कामावर निष्ठा, देशभक्ती, चिकाटी, नवीन प्रयोग करण्याचे धाडस आणि गुणवंतांना सतत पाठिंबा देत विज्ञानाचा पुरस्कार हे टाटा समूहाचे काही वैशिष्ट्यपूर्ण गुण आहेत. टाटा कुटुंबाने नेहमीच देशाहिताला प्राधान्य देत देशवासीयांच्या विश्वासाला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. तत्त्वयुक्त उद्योग हाच टाटा समूहाचा पाया आहे. उत्कर्षासाठी कधीही कसलीही तडजोड न करणारा उद्योग समूह म्हणून टाटांचा गौरवाने उल्लेख केला जातो. उद्योजक रतन टाटा यांच्या आजी मेहेरबाई यांचा या कुटुंबावर मोठा प्रभाव होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार लोहार यांनी तर प्रास्ताविक संजय बारी यांनी केले. वक्त्यांचा परिचय गौरव महाले यांनी करून दिला तर पवन राठी यांनी आभार प्रदर्शन केले. या ऑनलाइन गप्पांना मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More