राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २२ वा वर्धापन दिवस उत्साहात साजरा
चोपडा प्रतिनिधी :—-

शरद पवार यांच्या नेतृत्वात १० जून १९९९ रोजी स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज दि १० जून रोजी २२ वा वर्धापनदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा अरूणभाई गुजराथी यांच्या हस्ते चोपडा येथे गो भि जिनिंग मध्ये ध्वजारोहण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .

सोनिया गांधी यांच्या काँग्रेसमधील उदयानंतर वेगळी चूल मांडत शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला १० जून रोजी २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २२वा वर्धापन दिन आहे. स्थापनेपासून सत्तेत कायम वाटा असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जडणघडण कशी झाली?; याचा सविस्तर आढावा प्रा अरुणभाई गुजराथी यांनी घेतला .

महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात गेल्या साडेपाच दशकांपासून शरद पवार या नावाचा दबदबा आहे. राजकारणात मुरब्बी म्हणून शरद पवारांची ओळख पूर्वीपासून आहे. शरद पवारांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. पण त्याआधी ते काँग्रेस पक्षात कार्यरत होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विदेशी जन्माचा मुद्दा शरद पवारांनी उपस्थित केला होता. तसं पत्रही त्यांनी काँग्रेस नेतृत्वाला लिहलं होतं. शरद पवारांच्या या पत्रानंतर काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीनंतर शरद पवार यांच्यासह तारिक अन्वर आणि मेघालयातील पी. एम. संगमा यांना सहा वर्षासाठी काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं.

काँग्रेस पक्षानं निलंबनाची कारवाई केल्यानंतर शरद पवार यांनी बिहारमधील तारिक अन्वर आणि मेघालयातील पी. एम. संगमा यांच्या साथीने सन १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. शिवाजी पार्क येथे पक्षाची स्थापना करण्यात आली. मुळ विचारधारा काँग्रेसची असल्यामुळं आपण आपल्या पक्षाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस ठेवावं असं ठरलं. शिवाजी पार्क येथे पहिलं अधिवेशन घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घोडदौड सुरु झाली. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात राज्यात निवडणुका लागल्या. या निवडणुकांनंतर राष्ट्रवादी पक्ष काँग्रेससोबत सत्तेत आला. पक्षाच्या २२ वर्षांच्या इतिहासात हा पक्ष फक्त ५ वर्ष सत्तेबाहेर राहिला आहे.

सदर कार्यक्रम प्रसंगी चंद्रहास गुजराथी , भूपेंद्र गुजराथी , प्रविण गुजराथी , जीवन चौधरी , गोरख तात्या पाटील , राजेंद्र पाटील , गिरीष आप्पा पाटील , कांतीलाल पाटील , अतुल ठाकरे , मनिषा चौधरी , प्रा निलम पाटील , आशिष गुजराथी यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते .












