शिवसेनेच्या हितासाठी जे जे शक्य होईल ते करणारच; उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

मुंबई प्रतिनिधी शिवसेना आणि भाजपमधील सत्तावाटपाचा तिढा (Shivsena BJP Dispute) अद्याप कायम आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी चर्चा करतांना एक सूचक वक्तव्य केले आहे. सत्ता स्थापनेवरुन प्रश्न विचारला असता उद्धव यांनी ‘शिवसेनेच्या हितासाठी जे जे शक्य होईल ते करणारच’ असं उत्तर पत्रकारांना दिलं.
शिवसेना सत्तेतील समसमान वाट्यावर अडून बसल्यामुळे राज्यात सत्ता स्थापनेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. असं असतानाही महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार स्थापन होईल असा दावा फडणवीस यांनी विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर केला आहे. अशातच आता उद्धव ठाकरे यांनी शिवसेना ५०-५०च्या फॉर्म्युल्यावर तडजोड करण्यास तयार नसल्याचे संकेत देणारे वक्तव्य केले आहे. ‘सत्ता स्थापनेसाठी जे जे शक्य होईल ते करणारच’ असं वक्तव्य करुन उद्धव यांनी सर्व पर्याय खुले असल्याचे संकेत दिले आहेत. भाजपाने अद्याप शिवसेनेशी संपर्क केलेला नसल्याचीही माहिती समोर आली आहे.












