चोपड्यातील श्रीकृष्ण मंदिरात ४ ते १० सप्टेंबर दरम्यान भागवत सप्ताह; #अनेक दशकांची परंपरा

चोपड्यातील श्रीकृष्ण मंदिरात ४ ते १० सप्टेंबर दरम्यान भागवत सप्ताह; अनेक दशकांची परंपरा.

चोपडा (प्रतिनिधि):- भारताचा सांस्कृतिक ठेवा असणाऱ्या अठरा पुराणांपैकी श्रीमद् भागवत हा एक प्रमुख ग्रंथ आहे. महर्षी वेदव्यास यांनी रचलेला हा वैष्णव संप्रदायाचा एक प्रमुख ग्रंथ असून यात भगवान विष्णूच्या विविध अवतारांचे रंजक कथास्वरूपात वर्णन केले आहे. कर्मयोग, ज्ञान, वैराग्य व भक्ति जागृत करणारी कथा ही आहे. अशा या ग्रंथाचे वाचन ‘भागवत सप्ताह’ स्वरूपात अनेक दशके चोपडा येथील श्रीकृष्ण मंदिरात सुरू आहे. यावर्षी भागवत सप्ताहाचे आयोजन वेगळ्या स्वरूपात येथील श्रीकृष्ण मंदिरात ४ ते १० सप्टेंबर दरम्यान करण्यात आले आहे.


         येथील श्रीकृष्ण मंदिरात दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळच्या सत्रात ९ ते ११ या वेळेत मूळ संस्कृत ग्रंथाचे वाचन रविकुमार भालचंद्र शुक्ल हे करणार असून दुपारच्या सत्रात ४ ते ६ या वेळेत भागवत कथेचे वाचन डॉ. गिरीश श्रीकृष्ण टिल्लू हे करणार आहेत. तर ५ सप्टेंबर पासून दुपार व रात्रीच्या सत्रात सप्ताहात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज रात्री ८.३० ते १० या वेळेत पुढील प्रमाणे सांगीतिक कार्यक्रम होणार आहेत – दि. ५ सप्टेंबर, सोमवारी लक्ष्मी नारायण भजनी मंडळ (अकुलखेडा) भजन सादर करणार आहेत. ६ सप्टेंबर,मंगळवार रोजी शिवरंजनी संगीत विद्यालयाचे कलाकार भक्तिसंगित, ७ सप्टेंबर, बुधवार रोजी भागवत जाधव व शिष्यपरिवाराचे बासरी वादन, ८ सप्टेंबर, गुरुवारी प्रताप विद्या मंदिराचा कला व संगीत विभागातर्फे संगीत व चित्रकला संगम, ९ सप्टेंबर, शुक्रवारी वसंतभाई मयूर व शिष्य परिवारातर्फे संगीत साधना सादर होईल. दि. १० सप्टेंबर, शनिवार रोजी सकाळच्या सत्रात भागवत सप्ताह समाप्ती होईल. वरील सर्व कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


भागवत पुराणाविषयी थोडी माहिती:
भारताच्या सांस्कृतिक, धार्मिक व सामाजिक मूल्यांचा आधार बळकट करणारा हा ग्रंथ आहे असे अनेक विद्वानांचे निरीक्षण आहे. भारतीय तत्वज्ञानाचे अतिशय सोप्या व मधुर भाषेत वर्णन मूळ संस्कृत ग्रंथात आढळते. भागवत हे भारतातील विविध भागातील संतकवींचे प्रेरणास्थान आहे तसेच वारकरी संप्रदायाचा आधार आहे. बंगालचे चंडीदास, आसामचे शंकरदेव, ओरिसातील दीनकृष्णदास, कर्नाटकातील पुरंदरदास, महाराष्ट्रातील एकनाथ व नामदेव, गुजरातचे नरसी मेहता तसेच राजस्थानच्या मीराबाई या सर्व संतांचे काव्य भागवतावर आधारित आहे. संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज व गुलाबराव महाराज यांच्या उपदेशांतही या ग्रंथाचे सार आहे. विविध विषय व ज्ञानशाखांची चर्चा करणाऱ्या या ग्रंथाच्या १८००० सूत्रांची रचना १२ स्कंध व ३३२ अध्यायात केली आहे. श्रीमद्भागवत हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधकांच्या अभ्यासाचा विषय असून ऑक्सफर्ड विद्यापीठात यावर संशोधन प्रकल्प सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More