
सत्ता स्थापण्यासाठी राष्ट्रवादीचा ‘प्लॅन बी’ तयार!
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा जास्त झाला आहे. परंतु अद्याप राज्यात कोणाचे सरकार बसेल हे कोडे बनले आहे. हे कोडं सोडवण्यासाठी आता राष्ट्रवादी कॉंग्रेस एन एक्शनमोडमध्ये येणार असल्याचे समजत आहे.
विधानसभा निवडणुका भाजप शिवसेनेने युतीमध्ये लढल्या आहेत आणि जनतेने युतीला बहुमतदेखील दिले आहे. मात्र, तरिही सत्तास्थापनेचा तिढा अधिक गुंतागुंतीचा होत चालला आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे यावर तोडगा काढतील असे दिसते.
शिवसेना भाजपबरोबरची साथ सोडेल का नाही याची राष्ट्रवादी काँग्रेसला खात्री नाही. पण तरीही त्यांनी ‘प्लॅन बी’ (शिवसेना-राष्ट्रवादी) तयार ठेवला आहे. पक्षातील अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन करण्याची ही योजना असून काँग्रेसचा बाहेरुन पाठिंबा घेतला जाऊ शकतो. दोन्ही पक्ष काही छोटे पक्ष आणि अपक्षांना बरोबर घेऊन १२५ आकडा गाठण्याचा प्रयत्न करतील. काँग्रेसचा सरकारमध्ये थेट सहभाग नसेल. त्यांना समाजातील काही घटकांमधून प्रतिकूल प्रतिक्रिया येण्याची भीती आहे. गुरुवारी राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांनी बोलावलेल्या पक्षाच्या कोअर समितीसमोर यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. शिवसेना नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ही बैठक आयोजित करण्यात आली होती.












