चोपड्यात रथोत्सव उत्साहात.. श्री.बालाजी रथारुढ,भक्तांनी घेतले दर्शन…
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी –
चोपडा येथील श्री व्यंकटेश बालाजी संस्थानच्या वहनोत्सव व रथोत्सव मोठ्या उत्साहात परंपरे प्रमाणे साजरा करण्यात आला. रथावर श्री.बालाजींची मूर्ती आरुढ करुन श्री बालाजी देवस्थान पासून आशा टॉकीज , आई भवानी मंदिर मार्गे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात रथ मुक्कामी आहे. उद्या सकाळी दहा वाजता पुन्हा रथ ओढण्यास सुरूवात होईल व सायंकाळ पर्यंत नियमित ठिकाणी पोहचेल. सुमारे एक लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

नवरात्रीच्या काळात श्री.व्यंकटेश बालाजीचा वहनोत्सवाची परंपरा आजही कायम आहे. दरवर्षी ब्रम्होत्सवात श्री.बालाजी विविध वहनांवर आरूढ होवून शहरातील विविध भागात वाजत गाजत जावून भक्त दर्शनाचा लाभ घेतात.तसेच आश्विन शुध्द एकादशीला रथ निघून दोन दिवस रथयात्रा शहरात निघते.या यात्रेला सुमारे साडे तीनशे वर्षांची परंपरा आहे.

यावेळी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष प्रविण विठ्ठलदास गुजराथी, माजी विधानसभाध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी, उपनगराध्यक्ष भुपेंद्र गुजराथी, पीपल्स बॅंकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, किरण गुजराथी, रथोत्सव समितीचे संजय सोमाणी,मनिष पारिख,नितीन शहा,मनोज चौधरी,दिपक पाटील,किरण चौधरी,लालाभाई गुजराथी, विनोद हुंडीवाले,अचल अग्रवाल,पार्थ गुजराथी, यांच्यासह वहनोत्सवात व रथोत्सवात कार्यरत असणारे सर्व मानकरी व भाविक उपस्थित होते.

यात्रेत भुरटे चोरांनी दाखवले कर्तब..
बालाजी रथोत्सवात गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मनीष पारीख यांच्या खिशातून ३० हजार रुपये लांबविले तर प्रा. अरुण गुजराथी यांचे चिरंजीव आशिष गुजराथी यांचा मोबाईल देखील लांबविला . अशा अनेक प्रकारच्या घटना गर्दीचा फायदा घेत चोरांनी घडविल्या आहेत. बालाजी संस्थांतर्फे भुरट्या चोरांपासून सावध राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे













