चोपडा शहरातील रामपुरा भागातील अमरधाम ( स्मशानभूमी ) निर्मितीत कोट्यावधींचा भ्रष्टाचार ? … जन संघर्ष मोर्चाचे डॉ. रवींद्र पाटील यांचा घणाघात…
महाराष्ट्र 9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी:–
चोपडा शहरातील रामपुरा भागातील अमरधाम ( स्मशानभूमी ) चर्चेचा विषय बनली असून सदर अमरधाम ( स्मशानभूमी ) ही अवघ्या दीड ते दोन कोटी रुपयात पूर्ण होणारी असताना तिच्या बजेट साडेसहा कोटी रुपयांपर्यंत गेलाच कसा? असा प्रश्न जन संघर्ष मोर्चाचे डॉ. रवींद्र पाटील यांनी उपस्थित केला आहे.
सविस्तर वृत्त असे की , चोपडा शहरातील रामपुरा भागातील अमरधाम ( स्मशानभूमी ) एवढ्या मोठ्या सुसज्ज स्मशानभूमीची चोपडा शहरात खरोखरच गरज होती का ? असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यावल रस्त्याच्या पलीकडे पश्चिमेला चोपडा शहरातील 20 टक्के जनता वास्तव्यास असताना गोरगावले रस्त्याला किंवा यावल रस्त्याला एक स्मशानभूमीची अत्यंत गरज असताना त्या ठिकाणी स्मशानभूमी न करता शहरातील रामपुरा भागात भव्य दिव्य स्वरूपाची स्मशानभूमी बांधण्याची खरोखरच गरज होती का ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.


यावल रस्त्याला स्मशानभूमी असावी हा मुद्दा मी स्वतः सभागृहात देखील उपस्थित केला होता असे डॉ. रवींद्र पाटील यांनी मीडियाशी बोलताना सांगितले आणि त्याच्यासाठी गोरगावले रस्त्यावरील खदानी जवळील एक जागा सुद्धा बघण्यात आलेली होती पण लागेबांधे असलेल्या मंडळींनी सदर जागा सभागृहात मंजूर होऊ दिलेली नाही असा खेद देखील त्यांनी व्यक्त केला.
पावणे पाच कोटीचे अंदाजपत्रक असलेल्या स्मशानभूमीचा खर्च साडेसहा कोटी पर्यंत कसा गेला हा चिंतनाचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले. दीड ते दोन कोटी रुपयात होणारा स्मशानभूमीचा प्रकल्प साडेसहा कोटी रुपयात कसा गेला हे त्यांनी आपल्या शब्दातून मीडियाला स्पष्ट केले आहे.

त्यात त्यांनी गरज नसताना उभे केलेले भक्कम कॉलम , स्मशानभूमीचे अपूर्ण वॉल कंपाऊंड, लाकूड गृह , पाण्याची टाकी जुनेच आहेत तरी देखील अवास्तव खर्च झालाच कसा ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे .प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणारी ही मंडळी असून स्मशानभूमीच्या उद्घाटन समारंभ संपल्यानंतर जेवणाची मेजवानी लुटणारी हि मंडळी असून जेवणाची मेजवानी देणे हे अत्यंत खेदाची बाब असल्याचे ते म्हणाले. भ्रष्टाचाराचे कळस गाठणारा प्रकल्प म्हणजे चोपडा शहरातील रामपुरा भागातील स्मशानभूमी ( अमरधाम ) असल्याचे ते म्हणाले तसेच सदर समशानभूमी लोकांनी पहावी तिची जाहिरात व्हावी म्हणून चोपडा शहरातील कस्तुरबा शाळेमागील स्मशानभूमी आठ महिने बंद ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले तरी सदर स्मशानभूमीवर झालेला खर्च हा शंकास्पद व संशयास्पद असून सदर बाबीची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे….













