चोपड्यात खान्देशरत्न बहिणाबाई चौधरी जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे दि.९ व १० रोजी आयोजन, नगर वाचन मंदिराच्या पुढाकाराने पहिलाच प्रयत्न

चोपड्यात खान्देशरत्न बहिणाबाई चौधरी जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे दि.९ व १० रोजी आयोजन, नगर वाचन मंदिराच्या पुढाकाराने पहिलाच प्रयत्न


चोपडा – येथे दि.९ व १० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ,मुंबई व नगर वाचन मंदिर ( तालुका वाचनालय) यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक नगरी चोपडा शहरात जिल्हास्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.खान्देशरत्न बहिणाबाई चौधरी मराठी साहित्य संमेलन ‘स्व.डॅा.सुशिलाबेन शहा साहित्य नगरी’ परिसरात होणार असून दर्जेदार साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. त्यासाठी राज्यातील अनेक मान्यवर साहित्यिक उपस्थित राहणार असल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष आशिष गुजराथी व कार्यवाह गोविंद गुजराथी यांनी पत्रकार परिषदेत दिली.


शतकोत्तर परंपरा असलेल्या या वाचनालयाच्या सातत्याने ५२ वर्षांपासून चालणाऱ्या शारदीय व्याख्यानमालेने पंचक्रोषीतील रसिकांना अक्षरशः वेड लावले आहे.अनेक साहित्यिक, विचारवंत,कलावंत,पत्रकारांनी या व्याख्यानमालेचे पुष्प गुंफत श्रोत्यांना सजग केले आहे.तालुक्यात घरघरात वाचन संस्कृतीचा जागर करणाऱ्या या संस्थेने पुढाकार घेवून साहित्य सेवेचा वसा घेवून गेल्या वर्षी कवी निर्मिती कार्यशाळा घेतली.त्याच श्रृंखलेत यंदा महाराष्ट्र राज्य साहित्य च संस्कृती मंडळाच्या साहय्याने खान्देश कन्या महान कवयत्रि ‘खान्देशरत्न बहिणाबाई चौधरी’ जिल्हास्तरीय साहित्य संमेलन आयोजित करुन तालुकास्तरावर पहिलाच प्रयत्न केला आहे.त्याला सर्वथरातून मोठे योगदान व सहाय्य प्राप्त झाले आहे असेही गुजराथी यांनी सांगितले.
दि.९ ला ग्रंथदिंडी
या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्य व वाचन संस्कृतीचा जागर व्हावा म्हणून शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे.दि.९ रोजी दुपारी ४ वाजता गांधी चौकातील ऎतिहासिक नगर वाचन मंदिरापासून ग्रंथदिंडी निघणार आहे.यावेळी ग्रंथपुजन जेष्ठ धन्वंतरी डॅा.विकास हरताळकर व डॅा.विजय पोतदार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.ग्रंथदिंडीत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग राहणार आहे.भजनी मंडळाच्या सुरेल गायनासह अनेक रसिक,साहित्यप्रेमी या ग्रंथदिंडीत सहभागी होतील.समारोप महिला मंडळ माध्यमिक विद्यालयातील ‘स्व. डॅा.सौ.सुशिलाबेन शहा साहित्य नगरी’ परिसरात होईल.
साहित्य संमेलनाच्या निमित्त उद्घाटन सोहळ्यापुर्वी सकाळी साडे नऊ वाजता
दि.१० रोजी अभूतपूर्व उदघाटन सोहळा
चोपडा शहरातील स्व. डॅा.सौ.सुशिलाबेन शहा साहित्य नगरी’मध्ये प्रथमच होत असलेल्या जिल्हास्तरीय ‘खान्देशरत्न बहिणाबाई चौधरी मराठी साहित्य संमेलन २०१९’ चा उद्घाटन सोहळा सकाळी १० वाजता माजी विधानसभाध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल.उद्घाटन अ.भा.मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी (मुंबई) यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष साहित्यिक फ.मु.शिंदे ( अौरंगाबाद),साहित्यिक प्रा.डॅा.केशव देशमुख (नांदेड),महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य कवि अशोक सोनवणे( चोपडा) ,रमेश पवार (अमळनेर),भोपाळ (मध्यप्रदेश) येथील मराठी साहित्य अकादमीच्या नवनियुक्त निदेशिका आणि चोपड्याच्या सुकन्या पौर्णिमाबेन हुंडीवाले ( ब-हाणपुर),अभिनेता शंभू पाटील (जळगाव),साहित्यिक कुंदा प्रधान ( कोल्हापूर) हे उपस्थित राहणार आहेत.
विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन
या संमेलनात दुपारी एक वाजता ‘बोलीभाषांचे मराठी साहित्यात योगदान’ यासंदर्भात परिसंवाद होणार असून अध्यक्षस्थानी कविवर्य अशोक सोनवणे राहतील.तर दुपारी २ वाजता कविसंमेलन होणार असून त्याच्या अध्यक्षस्थानी कविवर्य रमेश पवार हे असणार आहेत.परिसंवाद व कवि संमेलनात सहभागी जाणकारांना निमंत्रीत करण्यात आले आहे.दुपारी तीन वाजता साहित्यिक पौर्णिमाबेन हुंडीवाले यांचे कथाकथन होणार आहे.तर दुपारी चार वाजता जेष्ठ अभिनेते शंभू पाटील यांचे “गांधीजी” या विषयी नाट्य अभिवाचन होणार आहे.” बहिणाबाईच्या काव्यात्मक जीवनाचा भावस्पर्शी प्रवास” हा एकपात्री प्रयोग सांयकाळी सहा वाजता कुंदा प्रधान (कोल्हापूर) या सादर करणार आहेत.रात्री सात वाजता अपर्णा भट कासार (जळगाव) व समुहाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने साहित्य संमेलनाचा समारोप होणार आहे.
स्व.डॅा.सुशिलाबेन शहांच्या कार्याचा गौरव
स्वर्गीय डॅा.सौ.सुशिलाबेन शहा यांनी आपले संपूर्ण जीवन साहित्य सेवेत आणि समाज सेवेत घालविले.त्या या नगरीच्या नगराध्यक्षा देखील होत्या.त्यांनी कवी स्व. दु.आ.तिवारी यांच्या काव्यावर प्रबंध सादर करून डॅाक्टरेट मिळविली.नगर वाचन मंदिराच्या अध्यक्ष व सांस्कृतिक समिती चेअरमन म्हणून अनेक वर्षे त्यांनी कामकाज पाहिले.त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून चोपड्यात होणाऱ्या पहिल्याच जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाच्या उपक्रमासाठी असलेल्या नगरीला त्यांचे नाव दिल्याचे उपाध्यक्ष प्रा.एस.टी.कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.

दि.९ रोजी होणाऱ्या ग्रंथदिंडीत तसेच दि.१० रोजी महिला मंडळ माध्यमिक शाळेच्या प्रांगणावरील ‘स्व.डॅा.सौ.सुशिलाबेन शहा साहित्य नगरी’तील साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमात रसिक श्रोते,नाट्यप्रेमी आणि नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष आशिष गुजराथी, उपाध्यक्ष प्रा.एस.टी.कुलकर्णी, कार्यवाह गोविंद गुजराथी, डॅा.परेश टिल्लू,तसेच सर्व कार्यकारणी सदस्यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेला नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष आशिष गुजराथी, उपाध्यक्ष प्रा.एस.टी.कुलकर्णी, कार्यवाह गोविंद गुजराथी, डॅा.परेश टिल्लू, संचालक मोरेश्वर देसाई, प्रफुल्ल गुजराथी,सोमनाथ बडगुजर, किरण गुजराथी, स्नेहल पोतदार,अॅड.अशोक जैन,प्रभाकर महाजन,अवधूत ढबू,श्रीकांत नेवे,संजय गुजराथी उपस्थित होते.प्रस्ताविक कार्यवाह गोविंद गुजराथी यांनी केले.आभार प्रभाकर महाजन यांनी मानले.सुत्रसंचलन श्रीकांत नेवे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More