अवैध वाळू वाहतूक जोमात… महसुल प्रशासन कोमात…

अवैध वाळू वाहतूक जोमात… महसुल प्रशासन कोमात…


महाराष्ट्र9न्यूज चोपडा प्रतिनिधी :-


सध्या वाळू उपशावर बंदी असताना चोपडा तालुक्यात मात्र रात्रभर अवैध वाळू वाहतुकीने थैमान घातले आहे.परंतु याकडे महसुल विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे की काय ? असा सवाल नागरिकांमधुन उपस्थित केला जात आहे.


रात्रभर शासनाचा महसुल बुडवून वाळुची बिनधास्त वाहतूक केली जात आहे. त्यामुळे ओहरलोड वाहतुकीमुळे रस्त्यांची पूर्ण वाट लागली आहे .परिणामी यामुळे शासनाला दुहेरी तोट्याला मुकावे लागत आहे. भरधाव येणाऱ्या वाळूच्या गाड्या यामुळे सध्या सुरु असलेल्या ऊस वाहतूकीला अडथळा निर्माण होत असून त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना रात्रीचा प्रवास जीव मुठीत धरून करावा लागत आहे.


काही वाळू माफियांनी महसूल विभागाच्या पथकातील कर्मचारी व अधिकारी यांना हाताशी धरून आपला व्यवसाय सुरू ठेवला असल्याची माहिती एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.
नाममात्र एखाद दोन वाहनांवर कारवाई करून कारवाईचा दिखावा करायचा असेच काही सूरू आहे. मागील आठवड्यात गोरगावले येथील रामचंद्र मुरलीधर कोळी यांच्या ट्रॅक्टरवर १,३५,००० रू ची दंडात्मक कारवाई केली. तसेच सध्या चहार्डी येथील गणेश रमेश पाटील यांचे डंपर क्रमांक जी जे १९ ५३७५ मधून भर दिवसा मुरूम वाहतूक केला जात असल्याने त्यांच्यावर पोलिस यंत्रणेने कारवाईचा बडगा उगारला मात्र महसूल विभाग स्पष्टपणे बोलण्यास धजावत नाहीये. सदर डंपर हे गणेश पाटील (चहार्डी ) यांचा नावावर असले तरी त्या मागे एका नामांकित दैनिकाच्या पत्रकार असल्याची जोरदार चर्चा सुरू असल्याची चर्चा असल्याने,याच कारणामुळे डंपर जप्त करून दहा दिवस उलटल्यानंतर पण कुठलीही कारवाई अजून महसूल प्रशासनाकडून करण्यात आली नसल्याचे समजते.


सर्वत्र वाळू वाहतूक नाममात्र बंद आहे. रात्रीच्या वेळी तब्बल २० ते २५ ट्रॅक्टर अवैधरीत्या वाळू वाहतूक बिनधास्तपणे करीत आहेत. जर वाळू बंद आहे तर मग बांधकामावर वाळू मुबलक प्रमाणात उपलब्ध होतेच कशी ? हा एक यक्ष प्रश्न आहे.
भरारी पथकातील काही तलाठी रात्रीच्या वेळी कारवाई करण्यास धजावत नाहीत. काही तलाठी मार खाण्याच्या भीतीने जात नाहीत तर काही वाळू माफियांशी साटे लोटे असल्याने आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहताना दिसून येत नाहीत.
तरी महसुल मधील वरिष्ठ अधिकारी यांनी अवैध वाळू वाहतुक बंद करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांसह धड़क कारवाई करण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More