चोपड्यात रस्ते अपघातांची मालिका सुरूच
सोमवारी रास्ता रोको : डॉ.चंद्रकांत बारेला
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा ( प्रतिनिधी ) –
चोपडा शहरातील चारही बाजूचे रस्ते खड्डेमय झाले असून दररोज यात अपघात होत आहेत,यात निरपराध लोकं मरत आहेत तर अनेकजण गंभीर जखमी होत आहेत. यासंदर्भात प्रशासनास निवेदने देऊन झाली, आंदोलने सुद्धा करण्यात आली आहेत,मात्र कुंभकर्णी झोपेचे सोंग घेऊन असलेले प्रशासन जागे होण्यास तयार नाही,त्यामुळे रस्ते अपघातात लोकांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या ठेकेदार,व त्यांना पाठीशी घालणाऱ्या सा.बा.विभागाच्या अधिकारी वर्गावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी डॉ.चंद्रकांत बारेला मित्रपरिवाराच्या वतीने सोमवारी सकाळी ११ वा.रास्तारोको करण्यात येणार आहे.तशा आशयाचे निवेदन चोपडा तहसीलदार,पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.


सोमवारी दि.५ रोजी सकाळी ११ वाजेला अकुलखेडे गावाजवळील पुलाजवळ सदर रास्तारोको करून काहीही चूक नसतांना केवळ रस्ते निष्कृष्ट असल्याने आपल्या प्राणास मुकावे लागत असल्यामुळे संबंधितांनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी आग्रही मागणी करण्यात येणार आहे,होणारे अपघात हे जात,पात,पक्ष,श्रीमंत,गरीब बघून होत नसतात म्हणून सगळ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन डॉ.चंद्रकांत बारेला मित्र परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.














