चोपडा येथील विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्रआयोजित भित्तिचित्र रंगविणे कार्यशाळा संपन्न….

चोपडा येथील विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्रआयोजित भित्तिचित्र रंगविणे कार्यशाळा संपन्न…

चोपडा (प्रतिनिधी)येथील विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्र,चोपडा. आयोजित भित्तिचित्र रंगविणे कार्यशाळा दिनांक ५ नोव्हेंबर व ६ नोव्हेंबर या दोन दिवशी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विवेकानंद विद्यालय येथे संपन्न करण्यात आली. यात विद्यालयातील दर्शनी भागातील भित्ती भारतीय चित्रशैली प्रकारात विविध प्राणी-पक्षी यांच्या आकारांच्या माध्यमातून चित्रित करून रंगविण्यात आल्या.दिवाळीची सुट्टी असतांना देखील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने विद्यालयात येऊन या कार्यशाळेचा मनसोक्त आनंद लुटला.या कार्यशाळेसाठी पुणे येथील चित्रकार आभा भागवत यांचे मुख्य मार्गदर्शन लाभले त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाचे कलाशिक्षक राकेश रा. विसपुते यांच्यासह विद्यालयातील सुमारे २५० विद्यार्थ्यांनी भित्तिचित्र रंगविणे कार्यशाळा संपन्न केली. चित्रकार आभा भागवत,पुणे यांनी लहानथोरांना सामावून घेऊन सहभाग भित्ति-चित्रांची संकल्पना प्रत्यक्षात आणली.चित्र प्रशिक्षण घेताना त्यांनी भरतनाट्यम व कर्नाटक संगीत याचं शिक्षण घेतलं व देश परदेशात अनेक ठिकाणी कला सादर केली.त्यांनी भारतातून जी.डी.आर्ट(पेंटिंग) डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन,एम.ए.इंडॉलॉजी, अमेरिकेमध्ये एम.एफ.ए.पदवी शिक्षण पूर्ण केले.त्या अनेक मान्यताप्राप्त नियतकालिकातून कला विषयावर नियमित लेखन करतात. लहान मुलं व प्रौढासाठी चित्रकला कार्यशाळा घेतात.काही मोजक्या पुस्तकांसाठी मुखपृष्ठ, बालभारती पुस्तकाचे मुखपृष्ठ तसेच शिक्षणविषयक चित्र त्या काढतात.पुण्यातील एका शाळेत चित्रकला शिकवतात.सर्व कला या परस्पर पूरक असतात आणि त्यांचा परिणाम आयुष्य समृद्ध होण्यासाठी सतत होत असतो.
गेल्या काही वर्षात त्यांनी केवळ स्वतःसाठी चित्र न काढता सर्वसामान्यांना सामावून घेऊन चित्र काढली आहेत. त्यांची सहभाग भित्ति-चित्रांची सुरुवात 2013 साली झाली.आणि गेल्या पाच वर्षात जवळजवळ 200 हून अधिक भिंती चित्रांनी बोलक्या झाल्या आहेत. सहभाग चित्र म्हणजे खूप मोठी भिंत चित्रकाराच्या मार्गदर्शनाने सर्वसामान्याने रंगवणे.या अनुभवाने सहभाग घेणाऱ्यांना अतिशय समाधान,आत्मविश्‍वास आणि आनंद मिळतो.सहभागींना यासाठी चित्रकलेतील कोणतेही प्रशिक्षण आवश्यक नाही.एक वर्षाच्या बाळापासून तर शंभरी गाठलेल्या वृद्धापर्यंत कोणीही याचा आनंद घेऊ शकतो.सहभाग घेणाऱ्यांची कला क्षमता कशी उपयोगात आणायची हे प्रमुख चित्रकार ठरवतो.समाजाच्या सर्जनाची अभिव्यक्ती अनुभवण्याचा हा एक विशेष अनुभव असतो. आतापर्यंत आभा भागवत यांनी मोठ्यात मोठी २०००चौ.फूट भिंत ऐंशी तासात रंगवली आहे आणि पाच हजारांहून जास्त माणसांबरोबर चित्र केली आहेत. हे काम जेवढं अवघड आहे तेवढच आनंददायी सुद्धा आहे अशा मोठ्या चित्रकारा सोबत विद्यालयातील विद्यार्थ्यांना दोन दिवस कार्यशाळेचा आनंद उपभोगायला मिळाला. कार्यशाळेत समारोपप्रसंगी चित्रकार आभा भागवत यांनी पालकांशी बालचित्रकलेतील टप्पे या विषयावर पालकांशी संवाद साधला त्यात त्यांनी आपल्या पाल्याशी कला विषयासंदर्भात काय करावे,काय करू नये याविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या उद्घाटन व समारोप प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय पोतदार,संस्थापक-अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर,उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल,सचिव अॅड.रविंद्र जैन,विश्वस्त सुधाकर केंगे,श्रीमती मंगला जोशी,गोवर्धन पोतदार,राधा हरताळकर,निर्मला पोतदार सह चंदुलाल पालीवाल,डॉ.विनीत हरताळकर,डॉ.निता हरताळकर,डॉ.अमित हरताळकर,जोत्स्ना हरताळकर,डॉ.निरज पोतदार, प्राचार्य राजेंद्र महाजन, दिनेश बाविस्कर मुख्याध्यापक नरेंद्र भावे, मुख्याध्यापिका वासंती नागोरे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.कार्यशाळेतील विद्यार्थ्यांपैकी लिपिका पाटील,कृष्णा बडगुजर निखिल ठाकरे, निल केंगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.समारोप सूत्रसंचालन उपशिक्षक प्रसाद वैद्य.व पाहुण्यांचा परिचय उपशिक्षक जितेंद्र देवरे आभार प्रदर्शन मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More