अ. भा. साहित्य संमेलनात अशोक सोनवणे निमंत्रित कवी
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी
चोपडा – ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान वर्धा येथे होणाऱ्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास चोपडा येथील प्रसिद्ध कवी अशोक नीलकंठ सोनवणे यांना निमंत्रित कवी म्हणून निमंत्रीत करण्यात आले आहे. ३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कवी संमेलनात ते आपली कविता सादर करणार असल्याचे पत्र अ. भा. साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रदीप दाते यांनी पत्राद्वारे कळवले आहे.

अशोक सोनवणे हे गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने लेखन करीत असून त्यांचे ३ कवितासंग्रह, निबंधमाला, ३ बाल नाटीका, १ बालकविता संग्रह, वर्तमानपत्रातील अहिराणी सदरे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या ‘बंडू जातो त्यांच्या वंशा’ या पुस्तकास राज्य शासनाचा बाल वाड.मय पुरस्कार मिळाला असून इतरही साहित्यकृतींना विविध स्तरावर गौरविण्यात आले आहे. ते आकाशवाणी मान्यताप्राप्त कवी आहेत.

ते महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चोपडा शाखेचे संस्थापक अध्यक्ष असून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे माजी सदस्य आहेत. तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या जळगाव केंद्राचे सदस्य आहेत. ते येथील प्रताप विद्या मंदिरातून मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले असून त्यांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार देखील मिळालेला आहे. या बद्दल मसाप चे जिल्हा प्रतिनिधी प्रा. तानसेन जगताप, डॉ. विकास हरताळकर, कार्याध्यक्ष विलास पाटील यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले.













