चोपडा महाविद्यालयात सूर्यग्रहण दर्शन पर्वणीचे आयोजन

चोपडा महाविद्यालयात सूर्यग्रहण दर्शन पर्वणीचे आयोजन


चोपडा: दिनांक २६ डिसेंबर २०१९ रोजी भारतातून दिसणारे सूर्यग्रहण दर्शन पर्वणीचे आयोजन महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाच्या भूगोल विभागामार्फत करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अँड. संदीप सुरेश पाटील, प्राचार्य डॉ. डी. ए .सूर्यवंशी, उपप्राचार्य व विभाग प्रमुख प्रा. एन. एस. कोल्हे, प्रा. सौ. माया शिंदे व डॉ. शैलेश वाघ इत्यादीसह सर्व प्राध्यापक व शिक्षक व्रुंद उपस्थित होते.
भारतातून दिसणाऱ्या सूर्यग्रहण या खगोल शास्त्रीय आविष्काराचा स्वानुभवातून अभ्यास करता यावा यासाठी महाविद्यालयाच्या प्रांगणावर सकाळी ८:०० ते ११:०० यादरम्यान प्राथमिक विद्यालय आणि कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय, कला, शास्त्र व वाणिज्य कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सूर्यग्रहण पाहण्यासाठी विशेष आवश्यक असलेले चष्मे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले. प्रत्यक्ष सूर्यग्रहण पाहतांना या खगोलशास्त्रीय घटनेविषयी विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या शंका, गैरसमज, अंधश्रद्धा दूर करण्यात आल्या. विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील या उपक्रमाचा लाभ घेतला.
प्रत्यक्ष सूर्यग्रहण पाहून झाल्यानंतर माहिती संप्रेषण तंत्राच्या आधारे ही खगोलशास्त्रीय घटना कशा प्रकारे घडते याबाबत डॉ. शैलेश वाघ यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांना भूगोल विभागातील प्रा. मुकेश पाटील यांनी सूर्यग्रहण एक खगोलीय घटना या विषयावर मार्गदर्शन केले.
या उपक्रमाचे आयोजन करण्यामागे सूर्यग्रहण विषयी समाजात व विद्यार्थी यामध्ये असलेल्या अंधश्रद्धा दूर होऊन त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा जेणेकरून विज्ञानाच्या आधारावर सक्षम व मजबूत समाज निर्मिती होईल असा उद्देश असल्याचे भूगोल विभाग प्रमुख व उपप्राचार्य प्रा. एन. एस. कोल्हे यांनी सांगितले. संपूर्ण उपक्रम आयोजनासाठी प्रा. पी. एस. पाडवी, सौ अनिता लांडगे, प्रा. सौ संगीता पाटील, प्रा. एम.बी. पावरा, प्रा. अभिजीत पाटील, प्रा. एम टी पावरा व भूगोल विभागातल सर्व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More