चोपडा शहर विकास मंच शहराच्या विकासाची गुढी उभारणार
चोपडा शहराच्या सर्वांगिण विकासाठी चोपडा शहर विकास मंच प्रयत्नशिल आहे. नागरिकांच्या सोईसुविधा व नगरपरिषदेच्या उत्पन्नाच्या स्त्रोत विकसीत करणे या दृष्टीने विकास कामांचे नियोजन, त्याकामी निधी मागणी, निधी मिळणेकामी पाठपुरावा करणे याबाबत आम्ही कटीबध्द आहोत. विविध विकास कामे पूर्ण करुन शहराचे सौंदर्य तसेच सुविधांमध्ये भर पडावी व नागरिकांना त्याचा लाभ व्हावा हाच चोपडा शहर विकास मंचाचा ध्यास आहे. गुढीपाडव्याच्या नागरिकांना शुभेच्छा देतांना नागरिकांचे असेच प्रेम व आर्शिवाद आम्हाला लाभावे ही अपेक्षा नगराध्यक्षा सौ. मनिषा जीवन चौधरी यांनी व्यक्त केली आहे.

चोपडा शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजुर झालेली आहे. योजनेचे पूर्णत्वानंतर येणारे पाणी आजच्या दोन वर्षापूर्वीच गुढीपाडव्याच्या शुभमुर्हूतावर ६ एप्रिल २०१९ रोजी उपलब्ध झालेले आहे. तसेच शहरात बहूतांश भागात नवीन वितरण वाहीनीचे काम पूर्ण झाले आहे. *अशाप्रकारे धरणाचे पाणी आपले दारापर्यंत आले आहे. सदरचे पाणी नागरिकांच्या नळाद्वारे घरात आले तर ख-या अर्थाने पाणीपुरवठा योजना फलश्रुत होणार आहे. आणि ते सर्वस्वी नागरिकांच्या म्हणजेच आपल्या प्रतिसादावर अवलंबून आहे. तसेच जुनी पाणीपुरवठा वितरण वाहिनी खंडीत करणेत येणार असुन फक्त नवीन वितरण वाहीनीवरुन पाणीपुरवठा सुरु राहील. याकरीता लवकरात लवकर नवीन नळजोडणी करुन घ्यावी. नळ जोडणी अभावी ब-याच प्रभागातील रस्त्यांची मंजुर कामे देखिल प्रलंबित आहेत. ती कामे त्या परिसरातील बहुसंख्य नळ जोडणी पूर्ण झालेवर सुरु करता येऊ शकतील. तरी नागरिकांनी जुनी जलवाहीनी बंद होण्याच्या आत लवकरात लवकर नगरपरिषद कर निर्धारण व संकलन विभागात फॉर्म व शुल्क भरणा करुन नवीन वितरण वाहिनीवरुन नळ जोडणी करुन घ्यावी. असे आवाहन चोपडा नगरपरिषद नगराध्यक्षा, उपाध्यक्ष, मुख्याधिकारी, गटनेते व सर्व सदस्यांकडून करणेत आले आहे.

*विविध २३ कोटींची विकास कामे लवकरच प्रत्यक्ष सुरु होणार*
विविध योजनेअंतर्गत प्राप्त अनुदानातुन कामे हाती घेण्यात आलेली आहेत. सदर कामांना प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली असुन त्यांच्या निविदा प्रसिध्द करणेत आलेल्या होत्या. दि.२० एप्रिल २०२१ पर्यंत सदर कामांचे कार्यादेश देण्यात येतील व नागरिकांना यावर्षाच्या गुढीपाडव्याची भेट म्हणून विकास कामांची गुढी उभारण्यात येत आहे. ज्यात १४ वा वित्त आयोग कार्यात्मक अनुदान रु. ९.०० कोटीतून फिश मार्केट बांधणे व शाहु महाराज शॉपिंग सेंटर मध्ये तळमजल्यात वाढीव गाळे बांधणे व पहिला मजला बांधकाम व प्रवेशद्वार करणे, नागरी दलित वस्ती योजनेअंतर्गत रु. ६.८१ कोटी ची रस्ता व गटारींची १४ कामे, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) अंतर्गत रु. ३.५० कोटी ची रस्ता व गटारींची ९ कामे आणि नागरी दलितेतर वस्ती सुधार योजना अंतर्गत रु. १.८३ कोटी ची रस्ते व गटारींची ७ कामे, नवि ६ योजनेतुन रु. ६३.१४ लक्ष ची २ कामे, १.२० कोटीचा बायोगॅस प्रकल्प, अग्नी सुरक्षा अभियान (जिल्हास्तर) रु. २९ लक्ष ची मिनी फायर फायटर खरेदी करणे इ. कामांचा समावेश आहे.

कारोना संसर्ग रोखण्याकामी प्रशासनास नागरिकांचे सहकार्य अपेक्षित
शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. रुग्णांची संख्या देखिल वाढतआहे. नागरिकांनी मास्क सॅनिटायजरचा वापर करावा नियमांचे पालन करावे, शासनाकडून वेळोवेळी लादून दिलेले निर्बंधांचे पालन करावे व प्रशासनास सहकार्य अपेक्षित आहे. कोरोनाला हरविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने त्याचा सामना करणे आवश्यक आहे. असे अवाहन नगराध्यक्षा सौ. मनिषा चौधरी यांनी नागरिकांना केले आहे.












